डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

तृतीयपंथी समाजाच्या न्याय, सन्मान व सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार
नांदेड | महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी तृतीयपंथी आघाडीच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक तसेच सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेडच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांची विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि तृतीयपंथी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वावलंबन, सामाजिक न्याय आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. जेठवाणी यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.

भारतीय शास्त्रीय नृत्य, लावणी आणि लोककला क्षेत्रातील संशोधक, कलाकार व समाजसेविका म्हणून त्यांनी देश-विदेशात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव वाढविला आहे. विविध राष्ट्रीय परिषद, सांस्कृतिक महोत्सव, संशोधन प्रकल्प, जनजागृती अभियान तसेच तृतीयपंथी सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांद्वारे त्यांनी समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. सान्वी जेठवाणी म्हणाल्या, “विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मिळालेली ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ पद नसून तृतीयपंथी समाजाला न्याय, सन्मान, समान संधी आणि सर्वांगीण विकास मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी आहे. शासनाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला मी नक्कीच पात्र ठरेन. शासनाच्या विविध योजना समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने कार्य करत राहीन.”

यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण, नांदेड जिल्हाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, सहकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करत, तृतीयपंथी समाजाला न्याय, सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी आपला संघर्ष व सेवा यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास डॉ. सान्वी जेठवाणी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!