“धर्माबादलाही मिळणार नवे महत्त्व”; वंदे भारत बासरपर्यंत नेण्याची मागणी

नांदेड, गोविंद मुंडकर| “ज्ञान, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीला जोडणारा विकासमार्ग आता रेल्वेच्या रुळांवरून धावला पाहिजे,” अशा ठाम आणि तिखट शब्दांत सीमाभागातील विकासप्रेमींनी मुंबई–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस थेट बासरपर्यंत वाढविण्याची मागणी पुढे रेटली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे कंदकुर्ती गाव आणि हिंदुस्थानातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता सरस्वतीच्या पवित्र मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या बासर या गावाला वंदे भारत रेल्वेने जोडण्याची मागणी तेलंगणातील धोडापुर येथील ग्रामस्थ आणि महाराष्ट्रातील बिलोली तालुक्यातील आरळी येथील ग्रामस्थ यांनी केली.

दिनांक २८ मे २०२६ रोजी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सीमावर्ती भागात आयोजित विकासप्रेमींच्या बैठकीत या मागणीने अक्षरशः केंद्रस्थानी स्थान मिळवले. सीमाभागातील विकासाच्या प्रश्नांवर चिंतन करताना उपस्थितांनी विविध विकास योजना, राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी, तसेच दुर्लक्षित भागांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा केली. मात्र या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली ती वंदे भारत रेल्वेची बासरपर्यंत वाढविण्याची मागणी.

बैठकीत बोलताना महाराष्ट्र सीमा भागातील सर्वश्री गोविंदराव मुंडकर,रामराव मरखले आणि तेलंगनातील श्री माधवराव शिवशेट्टे टाकळीकर, राम बासरकर, संतोष बंडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सीमाभागातील जनतेच्या जिद्दीचे आक्रोश समजून घ्यायला हवा . अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे सुयोग्य समन्वयामुळे विकासाची कामे गतीने होणे शक्य आहे. आता मुंबई येथून नांदेड पर्यंत धावणारी वंदे भारत हीच रेल्वे बासरपर्यंत गेली तर ज्ञान, श्रद्धा आणि संस्कृती यांचा त्रिवेणी संगम घडेल.”

त्यांनी पुढे अधोरेखित केले की, बासर हे केवळ एक गाव नाही, तर भारतीय संस्कृतीतील विद्येच्या उपासनेचे तेजस्वी केंद्र आहे. महाराष्ट्रातील हजारो सरस्वती भक्त, विद्यार्थी, पालक आणि भाविक दरवर्षी बासर येथे दर्शनासाठी जातात. अशा परिस्थितीत वंदे भारतसारखी आधुनिक रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास सीमाभागातील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला नवे पंख मिळतील.

या मागणीमुळे धर्माबाद रेल्वे स्थानकाचे महत्त्वही वाढणार असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या स्मृतींशी जोडलेले धर्माबाद रेल्वे स्टेशन नव्या विकास प्रवाहात केंद्रस्थानी येऊ शकते, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, या संपूर्ण विषयावर माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण काय भूमिका घेतात, याकडे आता सीमाभागाचे लक्ष लागले आहे. “सीमाभागाच्या विकासासाठी केवळ भाषणे नव्हे, तर ठोस राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे,” अशा शब्दांत काही सदस्यांनी नाराजीही व्यक्त केली.

बैठकीत जून महिन्यात लोकप्रतिनिधींना शिष्टमंडळाद्वारे भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या भेटीद्वारे वंदे भारत बासरपर्यंत वाढविण्याची मागणी अधिकृतपणे मांडली जाणार असून सीमाभागातील जनभावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सीमाभागातील विकासाच्या प्रश्नांवर अनेकदा राजकारणाचे धुरळे उडतात; परंतु प्रत्यक्ष विकासाच्या रुळांवर गाडी धावतेच असे नाही. अशा वेळी वंदे भारतचा हा मुद्दा केवळ रेल्वेचा नसून सीमाभागाच्या स्वाभिमानाचा, संस्कृतीचा आणि भविष्यातील विकासाचा प्रश्न बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!