नांदेडमध्ये जलसंधारण कामांना वेग

379 पैकी 177 कामे पूर्ण; भूजल वाढीसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नांदेड | एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मृद व जलसंधारण विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या एकूण ३७९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

यापैकी १७७ कामे पूर्ण झाली असून २०२ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत १ लाख ७८ हजार ६६८ मीटर खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून आणखी ८६ हजार ५८३ मीटर खोलीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या कामांमुळे पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचून होणारे नुकसान कमी होणार असून भूजल पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. परिणामी पाणीटंचाई निवारण, सिंचन सुविधा आणि शेती उत्पादन वाढीस चालना मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

एक लाख बांबू लागवडीचे उद्दिष्ट
जलसंधारण कामांच्या परिसरात एक लाख बांबू लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बांबू लागवडीमुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ अभियानालाही प्रतिसाद
दरम्यान, ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत सन २०२५-२६ मध्ये आतापर्यंत ५४ तलावांमधून गाळ काढण्यात आला आहे. ५८४ शेतकऱ्यांनी ९ लाख ६३ हजार २४३ घनमीटर गाळ शेतात टाकला आहे.

या उपक्रमामुळे संबंधित भागातील पीकपद्धतीत बदल होत असून गहू, हळद आणि कापूस यांसारख्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्या सोबतच रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

सन २०२६-२७ साठी या अभियानांतर्गत २८ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून अंदाजे ८ लाख ५८ हजार १३५ घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ ४८८ शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!