मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची आर्थिक झेप

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी राबविण्यात येणारी मिनी ट्रॅक्टर योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व आवश्यक उपसाधने उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये ९० टक्के शासकीय अनुदान असून उर्वरित १० टक्के हिस्सा बचत गटांकडून दिला जातो. लाभाची रक्कम थेट गटांच्या आधार-संलग्न संयुक्त खात्यात जमा केली जाते.

नांदेड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून, सन २०२३-२४ मध्ये १० तर २०२४-२५ मध्ये तब्बल ७३ बचत गटांना याचा लाभ मिळाला आहे. यामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे.

आनंदनगर येथील राणी महिला बचत गट हा योजनेचा प्रेरणादायी नमुना ठरला आहे. २०२४-२५ मध्ये निवड झाल्यानंतर या गटाला मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर आणि रोटॅव्हेटर मिळाले. त्यांनी खरीप व रब्बी हंगामात शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर करून सुमारे १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. तसेच उर्वरित काळात पाणी टँकर जोडून वापर केल्याने आणखी १ लाख रुपयांची कमाई झाली. या यशामुळे गटातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढला असून आर्थिक स्थैर्यही मिळाले आहे.

त्याचप्रमाणे गौतमनगर येथील ममता महिला बचत गट यांनीही या योजनेचा प्रभावी वापर करून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शेती मशागतीतून सुमारे १ लाख रुपये आणि इतर वापरातून सुमारे १.१० लाख रुपये असे एकूण उत्पन्न मिळवत त्यांनी आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा केली आहे.

या यशस्वी उदाहरणांमधून स्पष्ट होते की, शासनाच्या योजनांचा योग्य उपयोग केल्यास महिलांना स्वावलंबी बनण्याची मोठी संधी मिळते. मिनी ट्रॅक्टर योजना ही केवळ आर्थिक मदत नसून ग्रामीण महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!