
नांदेड| शहरातील गरजू वस्त्यांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘कूल रूफिंग’ उपक्रमामुळे घरांच्या आतील तापमानात तब्बल ७ ते ८ अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले आहे. या उपक्रमामुळे सुमारे १०० कुटुंबे व लघु व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


हा अभिनव प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ, Practical Action (PAC) आणि AIDMI यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निसर्ग आधारित उपाय’ (Nature-Based Solutions) अंतर्गत राबविण्यात आला आहे.


या योजनेअंतर्गत लहान व कमी उंचीच्या घरांच्या छतांवर ‘कूल रूफिंग’ तंत्रज्ञान वापरून उष्णता परावर्तित केली जाते, ज्यामुळे घरातील तापमान लक्षणीयरीत्या कमी होते. कडक उन्हाळ्यात घरांसह छोट्या व्यावसायिक जागांमधील उकाडा कमी झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य झाले आहे.



या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विष्णुनगर परिसरातील लाभार्थ्यांच्या घरी भेट देत प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी लाभार्थ्यांनी तापमानात झालेल्या घटेबद्दल समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.



या भेटीदरम्यान संचालक रोहित देशमुख, कार्यक्रम व्यवस्थापक सर्जेराव ढवळे, प्रसिद्धी व्यवस्थापक सचिन येरमाळकर, तसेच AIDMIचे तांत्रिक समन्वयक अरुंधती स्वामी, क्षेत्र समन्वयक शुभांगी जल्लेवार, सुभाष वाघमारे आणि चक्रधर पुयड उपस्थित होते.
पर्यावरणपूरक उपाययोजनांच्या माध्यमातून शहरी गरीब व लघु व्यावसायिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
