
लोहा| लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व त्यांच्या टीमकडून सुरू असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करत काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक वसंतराव पवार यांनी शहरातील काही गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.


शहरातील गजबजलेल्या भागात उघड्यावर होणारी मांसविक्री, बेशिस्त वाहतुकीमुळे होणारी रहदारीची कोंडी, हातगाड्यांचे अनियमित पार्किंग, तसेच नाल्यांवरील अतिक्रमण आणि शासकीय जागा भाड्याने देऊन आर्थिक फायदा घेण्याचे प्रकार यावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भातील त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. पवार यांनी नगराध्यक्ष, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व संबंधित प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.


शहरातील बसस्थानक, शिवाजी चौक, बेरळी फाटा या मुख्य मार्गांवर नाल्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरही त्यावर दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने, टपऱ्या, आलमारी व हातगाडे उभारले आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून संपूर्ण मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.


तसेच गंगाखेड, लातूर, कंधार व नांदेड येथून शहरात प्रवेश करताना रस्त्याच्या कडेला अनधिकृत मटन व चिकन दुकाने उभी असल्याचे दिसते. शहरातील वर्दळीच्या भागात उघड्यावर मांसविक्रीमुळे दुर्गंधी पसरत असून नागरिक, विशेषतः शाकाहारी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अशा विक्रीवर बंदी घालून एकाच ठिकाणी नियोजित व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


याशिवाय भाजीपाला विक्रेते मंडईऐवजी मुख्य रस्त्यावर विक्री करत असल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. हातगाडे कुठेही उभे केले जात असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र भाजी मंडई संकुल उभारण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली. वरील सर्व समस्यांवर लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना केल्यास वाहतूक कोंडी, दुर्गंधी आणि अतिक्रमणाचे प्रश्न सुटून लोहा शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे मत वसंतराव पवार यांनी व्यक्त केले.
