हिमायतनगर रेल्वे स्थानक विकासावर प्रश्नचिन्ह; प्रवासी त्रस्त, प्रशासन मात्र उदासीन

हिमायतनगर, अनिल मादसवार | कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या विकासकामांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामे अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

स्थानकावरील दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर अद्याप डिजिटल कोच पोझिशन डिस्प्ले बसवलेले नाहीत. परिणामी, गाड्या नेमक्या कुठे थांबणार याची माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पहिल्या प्लॅटफॉर्मवर केवळ जुने बांधकाम रंगरंगोटी करून नव्यासारखे दाखवले जात आहे, तर प्रत्यक्षात दुरुस्तीचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. छतामधून गळती होत असून एका बाजूला पाण्याची कमतरता तर दुसऱ्या बाजूला नळांमधून पाण्याचा अपव्यय सुरू असल्याचे चित्र आहे.

डिजिटल वेळापत्रक फलक नसल्यामुळे गाड्यांच्या आगमनाबाबत प्रवाशांना अंधारात ठेवले जात आहे. कोरोना काळापासून बंद असलेली पार्सल सेवा अद्याप सुरू न झाल्याने व्यापारी वर्गालाही फटका बसत आहे. स्थानक परिसरातील सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. उघडे लोखंडी रॉडमुळे प्रवाशांच्या जखमी होण्याच्या घटना घडत असूनही कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली आहे.

वाहनतळासाठी शेड उभारण्याचे आश्वासन हवेतच विरले असून, उन्हाळ्यात वाहने तापत आहेत तर पावसाळ्यात भिजण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानक परिसरात पोलीस चौकी उभारावी, चोरीच्या घटनांवर आळा घालावा, तसेच काही महत्त्वाच्या गाड्यांना थांबा द्यावा, अशा मागण्या नागरिकांकडून जोर धरत आहेत.

एकूणच, विकासाच्या नावाखाली केवळ दिखावा सुरू असून, प्रवाशांना मात्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रेल्वे प्रशासनाने तातडीने जागे होऊन परिस्थिती सुधारावी, अशी तीव्र मागणी होत आहे.

या विकास कामाच्या बातम्यानंतर मागील काळात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच संबंधित ठेकेदार व अभियंत्यास दर्जा सुधरण्याचे सूचित केले होते. त्यानंतर हिमायतनगर स्थानकाला विभागीय व्यवस्थापक यांनी भेदत येऊन पाहणी केली तसेच संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मात्र पुन्हा काम त्याच पद्दाथीने थातुर माथूर व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत केले जात असल्याच्या येथील परिस्थितीवरून दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!