हिमायतनगर, अनिल मादसवार| विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा नांदेड जिल्ह्यात सुरू असून, लवकरच समिती हिमायतनगर तालुक्यातील विविध ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, समिती या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सत्य समोर आणणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.


विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पैंगनगा नदीवरील कोठा, घारापूर आदी ठिकाणी उच्च पातळी बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. तसेच जलसंधारण विभागाकडून कामारी, एकघरी, वडगाव परिसरात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत बंधारे उभारले जात आहेत. मात्र या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे शासनाच्या विकासाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.


याशिवाय तालुक्यातील रस्ते, इमारती, सभामंडप, तीर्थक्षेत्र विकास आदी कामांवरही भ्रष्टाचाराची छाया असल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), लघु पाटबंधारे, जलसंपदा, वनपरिक्षेत्र, महावितरण, सामाजिक वनीकरण तसेच आदिवासी प्रकल्प विभाग किनवट अंतर्गत सुरू असलेल्या वस्तीगृह बांधकाम दर्जामध्ये अनियमितता असल्याचे आरोप होत असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जलजीवन मिशन (नळ योजना) अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा दर्जा, गटशिक्षण विभागातील कारभार, तसेच पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील बांधकाम पाणीपुरवठा सह विविध योजनांची अंमलबजावणी यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तालुक्यातील किनवट–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्ग, हिमायतनगर–सिरपली डोलारी मार्ग, सरसम–वाळकेवाडी, खडकी–पावनमारी, हिमायतनगर–धानोरा, हिमायतनगर–टेंभी, सरसम इंदिरानगर ते दरेसरसम आदी प्रमुख रस्त्यांची कामेही निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार आहे. तसेच पैंगनगा नदीकाठावर कामारी, दिघी, घारापुर, पळसपुर, सिरपली, कोठा, धानोरा, वारंटाकळी, टाकराळा, हिमायतनगर आदी भागातून अवैध रेती उपसा व मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप होत आहे.
शासनाकडून हजारो कोटींचा निधी उपलब्ध होत असूनही प्रत्यक्षात कामांचा दर्जा समाधानकारक नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे विधिमंडळ अंदाज समितीने तालुक्यातील सर्व कामांची वस्तुनिष्ठ तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सर्वसामान्य जनतेला विकासाचा प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या दौऱ्यातून खरोखरच निकृष्ट कामांची पोलखोल होणार का.. की नेहमीप्रमाणे समिती केवळ कार्यालयात बैठक घेऊन निघून जाणार…! याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




