पत्नीचा खून करून पळालेला आरोपी ५ तासांत जेरबंद; मुखेड पोलिसांची जलद कारवाई

मुखेड (प्रतिनिधी) पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या पाच तासांत अटक करत मुखेड पोलिसांनी तत्परतेचे उदाहरण सादर केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्णा (ता. मुखेड) येथील स्वाती खांडेकर या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना ६ एप्रिल रोजी सकाळी मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथे पाठवण्यात आला.

दरम्यान, मयत महिलेचा भाऊ योगेश देवकत्ते यांनी दिलेल्या तक्रारीत पती मारोती रामकिशन उर्फ बाबाराव खांडेकर (वय ३५) हा वारंवार पत्नीशी वाद घालत असल्याचे नमूद केले. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर आरोपीने साडीने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले.

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. मात्र पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे शेतशिवारात शोधमोहीम राबवली. अखेर ३ ते ४ तासांच्या शोधानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक जावेद शेख तसेच अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. या धाडसी आणि जलद कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे. या घटनेमुळे कौटुंबिक वादाचे भीषण परिणाम पुन्हा एकदा समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!