नांदेड| राज्यातील काही आमदार, मंत्री व अधिकाऱ्यांनी भोंदूगिरीला शरण जाऊन तंत्र-मंत्राच्या नावाखालील प्रकारांना पाठबळ दिल्याचा गंभीर आरोप करत, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ३९ आमदारांची यादी जाहीर करून त्यांचे तात्काळ राजीनामे घ्यावेत, तसेच अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली आहे.


या मागण्यांसाठी सोमवार (दि. ६ एप्रिल) रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. माकपने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे निवेदन सादर केले.


माकपच्या नेत्यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींवर संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. मात्र, काही जण अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असल्याने समाजात चुकीचे संदेश जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकत असल्याचा आरोप त्यांनी केला.

अधिकाऱ्यांवरही टीका करत, त्यांच्या प्रभावाचा गैरवापर करून अशा भोंदूगिरीला बळ दिले जात असल्याचे माकपने नमूद केले. “भोंदू बाबा जितके दोषी आहेत, तितकेच त्यांना पाठबळ देणारे लोकप्रतिनिधी व अधिकारीही जबाबदार आहेत,” असे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात समाज माध्यमांवर फिरणाऱ्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओंमुळे संबंधित महिलांची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याने असे व्हिडिओ तातडीने हटविण्याची मागणीही करण्यात आली.

याशिवाय, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करणे, जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, तसेच सोशल मीडियावरून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. विजय गाभने, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, कॉ. लता गायकवाड, डॉ. आदिनाथ इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले. आंदोलनात नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्यात आला.




