परंपरेला नवा अर्थ; मधुकर महाराज बारुळकर यांना ‘परिवर्तनवादी’ श्रद्धांजली

नांदेड (प्रतिनिधी) समाजप्रबोधनाची अखंड ज्योत चेतवणारे, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आणि नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शि.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांचे नुकत्याच झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने समाज जागृतीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांच्या विचारांचा दीप आजही अनुयायांच्या मनामनात प्रज्वलित आहे.

संत परंपरेचा वारसा जपत, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या भक्तीभावातून तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्य समाजपरिवर्तनासाठी अर्पण केले.

‘शिवधर्म’ पद्धतीने अंत्यसंस्कार
१ एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील बारूळ (मानार धरण परिसर) येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ‘शिवधर्म’ पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व जातीधर्मातील नागरिकांनी साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

पर्यावरणपूरक आणि विचारप्रधान विधी
३ एप्रिल रोजी अस्थिविसर्जन व ‘विटाळफेड’ विधी अत्यंत साध्या आणि परिवर्तनवादी पद्धतीने पार पडले. पारंपरिक रूढींना फाटा देत जिजाऊ वंदना घेऊन अस्थी व राख स्वतःच्या शेतात विसर्जित करण्यात आली. त्यानंतर आंबा, जांभूळ, लिंबू, पिंपळ, वड अशा विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. “मृत्यूही जीवनदायी ठरावा” हा संदेश देणारी ही कृती समाजासाठी प्रेरणादायी ठरली.

विचारांची जपणूक करणारा परिवार
महाराजांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा सुशिक्षित आणि समाजाभिमुख परिवार असून त्यांनी महाराजांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. मधुकर महाराज बारुळकर यांचा अखेरचा प्रवासही त्यांच्या विचारांप्रमाणेच साधा, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला आणि समाजाला दिशा देणारा ठरला. त्यांच्या स्मृतीतून रुजवलेले हे वृक्ष आणि विचार भविष्यात समाज परिवर्तनाची बीजे रोवतील, हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!