बांधकाम कामगारांसाठी योजना मोफत; दलालांपासून सावध राहा – प्रशासनाचा इशारा

नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ आता पूर्णपणे मोफत मिळत असून, कामगारांनी अनधिकृत एजंटांच्या जाळ्यात अडकू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया MAHABOCW.IN या अधिकृत संकेतस्थळावरून केली जाते. या संकेतस्थळावरील सर्व सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहेत. मात्र, काही दलाल व मध्यस्थ कामगारांकडून अर्ज भरण्याच्या नावाखाली पैसे उकळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही एजंटला पैसे देऊ नयेत. अर्ज स्वतः किंवा अधिकृत सेवा केंद्र (CSC / सेतू केंद्र) मार्फतच करावा. लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, तसेच आधार, बँक तपशील व OTP यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.

दरम्यान, कामगारांची फसवणूक किंवा आर्थिक शोषण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, तक्रार आल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांनी कामगारांना अधिकृत माहितीचा वापर करूनच अर्ज करण्याचे आवाहन केले असून, दलालांच्या भुलथापांना बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!