
नांदेड| शहरात वाढत्या बॅग लिफ्टिंग घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेत सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून २ लाख ५० हजार रुपये रोख, एक लाख ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भ्रतरीनाथ उर्फ भरत रवींद्र पवार (वय २५), नागेश छत्रपती वाहूळकर (वय १९) यांच्यासह इतर आरोपींचा समावेश असून काही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे. या धडक कारवाईमुळे शहरातील बॅग लिफ्टिंग टोळ्यांवर मोठा आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.


