हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगडीच्या मारोती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

हिमायतनगर, अनिल मादसवार | चैत्र शुद्ध नवमी, दि. ०२ एप्रिल रोजी साजऱ्या झालेल्या हनुमान जयंती निमित्त विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक व मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या बोरगडी येथील मारोती मंदिरात संकटमोचन श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. “जय हनुमान… जय श्रीराम… बजरंगबली की जय…” अशा जयघोषात भक्तांनी नारळ फोडून श्रींचे दर्शन घेतले.

नवसाला पावणाऱ्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे ३० हजारांहून अधिक भाविकांनी दिवसभरात दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त केली. अनेक भक्त हिमायतनगरहून तळपत्या उन्हात पायी चालत येऊन नवस फेडताना दिसून आले.

oplus_0

प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी पूजा-अभिषेक केल्यास भय दूर होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यानिमित्ताने रुचकीची पाने, फुलांच्या माळा, फेटे अर्पण करून भक्तांनी सुख-समृद्धीची प्रार्थना केली. हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

oplus_0

पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंत्रोच्चारात सकाळी धार्मिक विधी पार पडले. या कार्यक्रमाला हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

oplus_0

दि. ०३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता हभप नारायण महाराज आर्वीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता भव्य कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन होणार असून, कुस्त्यांच्या दंगलीत विजयी होणाऱ्या मल्लांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. यात्रा उत्सवातील शेवटच्या क्षणी कुस्ती शुंकीं व ग्रामस्थांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

oplus_0

शहर व तालुक्यातील विविध हनुमान मंदिरांतही जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भजन, कीर्तन आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमांमुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. तळपत्या उन्हाचा विचार करून बोरगडीकडे जाणाऱ्या मार्गावर भाविकांसाठी ठिकठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दानशूर व्यक्तीकडून करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!