लोहा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व शादीखाना प्रश्न मार्गी लागणार

लोहा/नांदेड | लोहा शहरातील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच मुस्लिम बांधवांच्या शादीखान्याच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

ही बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीनंतर आमदार चिखलीकर यांनी लवकरच जागेचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी (आयएएस), निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, नगराध्यक्ष शरद पाटील पवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपनगराध्यक्ष करीम शेख, मन्नान चौधरी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लोहा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी शादीखान्याच्या उभारणीसाठी जागा निश्चित करण्या बाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आमदार चिखलीकर यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याशिवाय माळेगाव यात्रा येथे सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी महावितरणची ना हरकत, तसेच श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान यात्रेच्या परिसर विकासासाठी ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीत आमदार चिखलीकर यांनी खंडोबा यात्रेची जागा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दाही उपस्थित केला. विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा होऊन संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीमुळे लोहा शहराच्या विकासाला गती मिळणार असून नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना लवकरच न्याय मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!