“परंपरेचा अभिमान, नव्या युगाची शान – बिलोलीची कुस्ती पुन्हा सज्ज!”
हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार, दि. ३ एप्रिल रोजी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत कुस्तीस्पर्धा

बिलोली, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहराची कुस्ती परंपरा ही केवळ क्रीडा नसून संस्कृतीचा जाज्वल्य वारसा मानली जाते. तब्बल शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या भूमीने अनेक नामांकित पैलवान घडवले असून, कुस्तीच्या माध्यमातून बिलोलीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.


मागील वर्षी १३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या जंगी कुस्त्यांनी इतिहास रचला होता. नगराध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी यांच्या ५१ हजार रुपयांच्या इनामी कुस्तीपासून ते बी.पी. नरोड दादा (३१ हजार) आणि अभिजीत तुडमे (२१ हजार) यांच्या लढतींनी प्रेक्षकांची मने जिंकली. जिल्हा क्रीडा अधिकारी शंकर भास्करे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यांतील पैलवान सहभागी झाल्याने स्पर्धेचा दर्जा उंचावला होता.


पूर्वीच्या काळात कुस्तीनंतर नाच-गाण्याची परंपरा होती. कालांतराने ती लोप पावली होती; मात्र नगरसेवक प्रतिनिधी गंगाधर पप्पुलवार यांच्या पुढाकारातून ही परंपरा पुन्हा सुरू झाली असून, सांस्कृतिक जतनाचा हा सुंदर प्रयत्न ठरला आहे.

यावर्षीचा विशेष आकर्षण म्हणजे बिलोलीच्या इतिहासात प्रथमच महिला पैलवानांचा सहभाग! यशवंत गादगे आणि नागनाथ तुमोड यांच्या मानधनातून महिला क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळत असून, कुस्ती क्षेत्रात महिलांसाठी नवे मार्ग खुले होत आहेत.

कुस्ती परंपरेचे मानकरी धोंडीबा मामा शंखपाळे यांच्या योगदानामुळे या परंपरेला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, मागील वर्षी काही माजी पैलवान व प्रतिष्ठित व्यक्तींची अनुपस्थिती जाणवली होती. त्यामुळे यंदाच्या कुस्त्यांमध्ये सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळा मैदान, बिलोली येथे भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या प्रमुख इनामी कुस्त्या पुढीलप्रमाणे :
🥇 ₹७५,००० – संतोषदादा कुलकर्णी
🥈 ₹५१,००० – बी.पी. नरोड
🥉 ₹२१,००० – सुनील बाबाराव अबडवाड
🏅 ₹११,००० – सुभाष शिवाजीराव पाटील खंडेराय
🏅 ₹११,००० – बोईनवाड वकील साहेब
🏅 ₹११,००० – बोयणे सर
🏅 ₹११,००० – अभिजीत यादव तुडमे
🏅 ₹११,००० – हनुमंतराव पाटील बोळेगावकर
🏅 ₹११,००० – नागभूषण अण्णा (इडली सेंटर)
कुस्त्यांचे नियोजन अधिक सक्षम व्हावे यासाठी प्रकाश योजना, प्रेक्षकांची बैठक व्यवस्था तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या पैलवानांसाठी जेवण, निवास व इतर सोयींची उत्तम व्यवस्था करण्यावर भर देण्यात येणार आहे. मागील वर्षी वरिष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर व राज्यस्तरीय कलाकार दिलीप खंडेराय यांच्या प्रभावी रनिंग कॉमेंट्रीमुळे कुस्त्यांना विशेष रंगत आली होती. यंदाही त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग लाभण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बिलोलीची कुस्ती परंपरा ही भूतकाळाचा गौरव तर आहेच, पण भविष्यासाठी प्रेरणादायी ठेवा देखील आहे. नवीन पिढीने ही परंपरा जपत तिला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.“चला… परंपरा जपूया, कुस्तीचा वारसा पुढे नेऊया!”
