नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; ७ अवैध शस्त्र जप्त, १७ आरोपी जेरबंद

नांदेड | नांदेड शहर व जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्यावर लगाम लावण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईत ७ अवैध अग्निशस्त्रांसह ७६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून तब्बल १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही विशेष मोहीम १ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विविध ठिकाणी सापळे रचून ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या आकडेवारीनुसार, या मोहिमेत ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ७ अग्निशस्त्र, ७६ काडतुसे आणि ३ मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत.

अवैध शस्त्र बाळगणे हे केवळ गंभीर गुन्हा नसून समाजासाठी मोठा धोका ठरत असल्याने अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, गुन्हेगारी रोखण्यासाठी “Preventive Karvai Cell” स्थापन करण्यात आला असून, २+ स्कीमअंतर्गत कठोर कारवाई सुरू आहे. यामध्ये सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए व मोक्का अंतर्गतही कारवाई करण्यात येत आहे.

नांदेड पोलिसांनी सुरू केलेली ही धडक मोहीम पुढेही सुरू राहणार असून, नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!