पत्रकार डॉ. मोहसीन खान यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार

मुंबई /नांदेड| बिलोली येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोहसीन खान मुजीबपाशा यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

मुंबई येथील नरिमन पॉईंट स्थित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित भव्य समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन २०२१-२२ या वर्षासाठी घोषित करण्यात आलेल्या या पुरस्कारांतर्गत डॉ. खान यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे बिलोली तालुक्याच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

डॉ. मोहसीन खान हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती, पर्यावरण, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. विशेषतः पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी व्यसनाधीनतेविरुद्ध सातत्याने लेखन करत जनजागृती घडवून आणली आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट, आमदार तुषार राठोड, माजी गृहमंत्री सिद्धराम म्हेत्रे, उपसचिव रविंद्र गोरवे यांच्यासह समाजकल्याण विभागाचे अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील व धनश्री प्रधान यांनी केले, तर आभार समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी मानले.

डॉ. मोहसीन खान यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, विक्रम काळे, सतीश चव्हाण, आनंदराव बोंढारकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व हितचिंतकांनी अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!