नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात दिव्यांगांसाठी ‘शाईन विथ ॲबिलिटी’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात

नांदेड| दिव्यांगांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या उद्देशाने शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय, नांदेड येथे 28 मार्च 2026 रोजी ‘शाईन विथ ॲबिलिटी’ या शीर्षकाखाली विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वीणा पाटील या होत्या. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. छाया पोटे यांनी जबाबदारी सांभाळली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद, नांदेड येथील समाज कल्याण अधिकारी श्री. सत्येंद्र आवुलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या भाषणात श्री. आवुलवार यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शासकीय योजना, विविध सवलती तसेच करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन करत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान प्रेरणादायी विचार व मार्गदर्शनपर सत्रांमधून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी नांदेडचे क्रीडा संचालक डॉ. चरणजीत सिंग यांनी आभार प्रदर्शन केले. महाविद्यालय प्रशासनाने या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!