नांदेडजवळ कामठा येथे पोलीस उप महानिरीक्षक उमाप यांच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
41 आरोपी ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड| नांदेड शहराजवळील गाडेगाव रोडवरील कामठा गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 41 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 11.47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस उप महानिरीक्षकांना ‘खबर’ हेल्पलाइनवरून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार 27 मार्च रोजी पथकाने कामठा परिसरात जगनलाल देविलाल यादव यांच्या जागेवरील टिनशेडमध्ये सुरू असलेल्या ‘पपलू’ नावाच्या जुगारावर छापा टाकला.


या धाडीत आरोपींकडून: ₹1,50,950 रोकड, 37 मोबाईल फोन, 12 मोटारसायकली असा एकूण ₹11,47,950 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 112/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि संतोष जोंधळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


जुगार प्रशिक्षण केंद्राचा पर्दाफाश – उपलब्ध कागदपत्रांनुसार, या ठिकाणी जुगार खेळण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे उघड झाले आहे. हे तथाकथित प्रशिक्षण केंद्र ‘राज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ’, चिंचवडगाव (ता. वडवणी, जि. बीड) यांच्या माध्यमातून चालविले जात असल्याची माहिती आहे. याआधीही परभणी जिल्ह्यातील लिमला (ता. ताडकळस) आणि मर्डसगाव (ता. गंगाखेड) येथे अशाच प्रकारच्या जुगार केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती.

नागरिकांना आवाहन – आपल्या परिसरात अशा प्रकारचे जुगार अड्डे किंवा प्रशिक्षण केंद्र आढळल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नागरिकांना केले आहे.
पथकाचे कौतुक – या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांचा सहभाग होता. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन करत ₹10,000 बक्षीस जाहीर केले.



