क्राइम

झटपट श्रीमंतीच्या आमिषातून शिक्षकाची निर्घृण हत्या; दोघे अटकेत, चालक निर्दोष

हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक गणेश गुड्डा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या कार चालकाला मात्र तपासाअंती निर्दोष घोषित करत मुक्त करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडून गणेश गुड्डा काही संशयितांच्या संपर्कात आले होते. संबंधितांनी मोठी रक्कम घेऊन येण्यास सांगितल्याने ते पैसे घेऊन गेले. मात्र पैशांच्या व्यवहाराच्या वेळी आरोपींनी त्यांच्याकडील रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करताच आरोपींनी त्यांच्या डोक्यात जड वस्तूने प्राणघातक हल्ला केला.

हल्ल्यानंतर आरोपींनी गुड्डा यांना जबरदस्तीने कारमध्ये टाकले आणि काही अंतरावर चालत्या वाहनातून खाली फेकून दिले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारचा चालक अनिल शिंदे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र कॉल डिटेल्स व अन्य पुराव्यांवरून त्याचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. उलट, जखमी गुड्डा यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी त्याने मदत केल्याचे समोर आले आहे.

चालकाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी खामगाव येथील दोन आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे. तपासादरम्यान वाहनातून ‘चिल्ड्रन बँक’ अशी छाप असलेल्या बनावट नोटा आढळून आल्याने आरोपींनी नकली नोटांच्या आमिषातून फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!