स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांचे निधन
ग्रामस्वच्छता, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी आवाज हरपला
नांदेड, प्रतिनिधी| ग्रामस्वच्छता, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी आयुष्यभर नाते जोडून कार्य करणारे स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांचे १ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने स्वच्छता व ग्रामविकास चळवळीतील एक अभ्यासू, संवेदनशील आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’च्या माध्यमातून त्यांनी स्वच्छतेला केवळ परिसर स्वच्छ ठेवण्यापुरते मर्यादित न ठेवता त्याला व्यापक सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. लोकसहभाग, पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि सामाजिक जाणीव या बाबींना त्यांनी आपल्या कार्यातून प्राधान्य दिले.
राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील अनुभव आणि ग्रामविकासाचा विचार विविध व्यासपीठांवर मांडला. कोलंब...
