तामसा घाटात तीन बछड्यांसह मादी बिबट्याचे दर्शन; रस्त्यावर पाणी पीत असतानाचा व्हिडिओ व्हायरल
नांदेड | नांदेड जिल्ह्यातील तामसा रोडवरील घाट परिसरात मादी बिबट्याचे आपल्या तीन बछड्यांसह दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात साचलेले पावसाचे पाणी पीत असतानाचे थरारक दृश्य काही वाहनधारकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लहान-लोन गावाजवळ रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना अचानक रस्त्यावर मादी बिबट्या व तिचे तीन बछडे दिसून आले. रस्त्याच्या मधोमध थांबून खड्ड्यात साचलेले पाणी पित असलेल्या बिबट्यांचे दृश्य पाहून काही काळ वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, काहींनी प्रसंगावधान राखत सुरक्षित अंतरावरून या घटनेचे चित्रीकरण केले.
दरम्यान, या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा यापूर्वीपासून होत असतानाच, या नव्या दर्शनामुळे त्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. ...
