पैनगंगा काठावर केबल चोरट्यांचा हैदोस; २५–३० शेतकरी अंधारात, सुमारे ३ लाखांचे नुकसान
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील धानोरा ज. शिवारात पैनगंगा नदी परिसरात अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लक्ष्य करत मोठा डल्ला मारला आहे. दिनांक ११ एप्रिलच्या रात्री २५ ते ३० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या कनेक्शन केबलची चोरी करण्यात आली असून, या प्रकारात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील ही सलग चौथी घटना असून, अद्याप एकाही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.
नदी व शेतीमधील अंतर मोठे असल्याने शेतकऱ्यांनी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करत मोटारींना ऑटोमॅटिक स्टार्टर बसवले आहेत. शेतकरी दररोज मोटारीकडे जात नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, श्रीक्षेत्र बोरगडी येथील माजी सरपंच देवन्ना शेन्नेवाड यांचे पुत्र ज्ञानेश्वर शेन्नेवाड यांना रात्री सुमारे ११.१५ वाजता शेतात पाणी आले नसल्याने संशय आला. ते मोटारीकडे गेले...

