खरीप पेरणीची घाई टाळा; ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा : तालुका कृषी अधिकारी
शेतकऱ्यांना शास्त्रोक्त नियोजनाचे आवाहन; बीज उगवण चाचणी व बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला
नांदेड | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, अर्धापूर यांनी केले आहे. परिसरात किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन बियाण्यांची उगवण चांगली होईल आणि पिकांच्या सुरुवातीच्या वाढीस पोषक वातावरण मिळेल, असे त्यांनी सांगितले.
हवामानातील सातत्याने होत असलेले बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या हवामान आधारित सल्ल्याचे पालन करावे. योग्य वेळी पेरणी केल्यास पिकांवरील जोखीम कमी होण्यास मदत होते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बीज उगवण चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. बियाण्यांची उगवण क्षमत...
