*अमरनाथ गुहेतून* – भाग 16 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
आजच्या अंकात प्रवासात सोबत असलेल्या यात्रेकरुंच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
*सुभाष देवकत्ते*
दिलीपभाऊंसोबतची ही माझी सलग अकरावी अमरनाथ यात्रा. प्रत्येक वर्षी त्यांच्यासोबत प्रवास करताना त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्याने उलगडत जाते. माझ्या दृष्टीने ते पर्यटन क्षेत्राचे भीष्म पितामह आहेत. आजवर त्यांनी विक्रमी २७ वेळा श्री अमरनाथचे दर्शन घेतले असून, प्रत्येक वेळी शेकडो भाविकांना सुरक्षित, सुखकर आणि संस्मरणीय यात्रा घडवून आणली आहे. एवढ्या मोठ्या यात्रेचे व्यवस्थापन करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र कोणतेही संकट आले, अडचण निर्माण झाली किंवा परिस्थिती बदलली तरी दिलीपभाऊ कधीही गोंधळत नाहीत. शांत डोक्याने निर्णय घेऊन ते प्रत्येक प्रश्नावर सहज मार्ग काढतात.
शंभराहून अधिक यात्रेकरूंचा संपूर्ण समूह ते अक्षरशः एकहाती सांभाळतात. प्रत्येकाची माहिती, प्रवासाचे वेळापत्रक, मुक्काम, जेवण, दर्शन, वाहतूक, आरो...
