आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा भव्य मोर्चा कंधार तहसीलवर धडकला

हक्कासाठी हजारो समाजबांधवांची उपस्थिती

कंधार, सचिन मोरे| अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड नुसार उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे या प्रमुख मागणीसह मातंग समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने सोमवारी २९ जून रोजी कंधार येथे भव्य आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. तीव्र घोषणा देत शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत निघालेल्या मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक देत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी मोर्चात हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या आदेशानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करणे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देणे, मुंबई विद्यापीठास त्यांचे नाव देणे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून देणे, कंधार येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामास गती देणे, मातंग समाजाच्या राज्यस्तरीय नेत्यांना पोलीस संरक्षण देणे तसेच उपवर्गीकरणासाठी प्राणांची आहुती दिलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी देणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनस्थळी उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव , अण्णाभाऊ साठे क्रांति सेना संस्थापक सचिन साठे आणि आरक्षण अभ्यासक केशव शेकापुरकर यांनी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करत त्यांनी मातंग समाजाच्या न्याय मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशारा दिला.

या आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी रामभाऊ देव कांबळे, पंडितराव देवकांबळे, नगरसेवक कैलास कांबळे, दिलीप बसवंते,बालाजी वाघमारे, बालाजी कांबळे, महेंद्र कांबळे, विलास मल्हारराव वाघमारे, विजय वाघमारे, बाबुराव टोम्पे, विलास गायकवाड, एम.पी. गायकवाड, संभाजी गडंबे, मुन्ना बसवंते, हनुमंत घोरपडे, प्रकाश ननुरे, ॲड सचिन कांबळे, व्यंकट घोरपडे, ईश्वर येरेकर, पंडित भटलारे, आकाश घोडजकर, अर्जुन मोरे, नारायण सोमवारे, दिनाजी शिंदे, प्रताप कांबळे, भाऊसाहेब कांबळे, संजय दूधकावडे, नितीन बंडेवार, पराक्रम कांबळे, श्याम गडंबे आणि संतोष कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कंधार तालुक्यातील विविध गावांतून मोठ्या संख्येने समाजबांधव आंदोलनात सहभागी झाल्याने मोर्चाला व्यापक प्रतिसाद मिळाला. शांततापूर्ण पण निर्धारपूर्ण वातावरणात झालेल्या या आंदोलनाने मातंग समाजाच्या एकजुटीचे प्रभावी दर्शन घडविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!