एल निनोच्या सावटाखाली खरीप हंगाम; शेतकऱ्यांना सावध पेरणीचा कृषी विभागाचा सल्ला

कमी पावसाच्या शक्यतेमुळे पीक नियोजन, आंतरपीक आणि जलसंधारणावर भर देण्याचे आवाहन
नांदेड | यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध शेती करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

कृषी विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय मुख्य पिकांची पेरणी टाळावी. किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करणे सुरक्षित ठरेल. अन्यथा उगवण कमी होऊन दुबार पेरणीचा आर्थिक फटका बसू शकतो.

सोयाबीन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना
वाढते उत्पादन खर्च आणि हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी. तसेच घरचे प्रक्रिया केलेले बियाणे, जैविक खते आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊ शकते.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचाही सल्ला दिला आहे. यामुळे जोखीम कमी होऊन नैसर्गिक आपत्तीच्या काळातही उत्पन्नाचे पर्यायी स्रोत उपलब्ध राहतात.

जलसंधारणाला प्राधान्य
पावसाचा खंड पडण्याची शक्यता लक्षात घेता शेतात पडणारे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. शेततळी, चर, बंधारे तसेच पीक आच्छादन यांसारख्या उपायांमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होणार आहे.

पीक विमा घेण्याचे आवाहन
अतिवृष्टी, दुष्काळ, पावसाचा खंड किंवा उत्पादन घट यांसारख्या नैसर्गिक संकटांपासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणे अत्यावश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

संतुलित खत व्यवस्थापन गरजेचे
कमी पावसाच्या परिस्थितीत रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय खते, कंपोस्ट आणि निंबोळी पेंड यांचा वापर वाढविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्या सोबतच उत्पादन खर्चावरही नियंत्रण मिळवता येणार आहे.

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
“एल निनोमुळे हवामानात मोठी अनिश्चितता निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना नुसारच पेरणी, खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाचे निर्णय घ्यावेत,” असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. “घाईची पेरणी टाळा, नियोजनबद्ध शेती करा आणि पिकांचा विमा उतरवा,” असा संदेश कृषी विभागाने शेतकरी बांधवांना दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!