
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध गांज्याच्या तस्करीवर मोठी कारवाई करत १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणात गु.र.नं. 433/2026 अंतर्गत एनडीपीएस कायदा १९८५ (कलम 20(B), 22(B), 25) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई चंदनसिंग कॉर्नर येथे २२ एप्रिल रोजी पहाटे २.१० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.


पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.


नाकाबंदी दरम्यान देगलूरकडून नांदेडकडे येणारी एक संशयित Maruti Dzire कार (TS09UC-6085) थांबवून तपासणी केली असता डिकीत २२ किलो वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी सुमारे ४.४० लाख रुपये किंमतीचा गांजा व ९ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण १३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.


चौकशीत मुख्य आरोपी अकबर अहमद खान पठाण याने हा माल तेलंगणातील बोधन येथून आणल्याची कबुली दिली. तसेच या प्रकरणात एकूण १७ आरोपींचा समावेश असून संपूर्ण सप्लाय चेन नांदेडमध्ये विविध ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. उर्वरित १५ आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, “ऑपरेशन ब्रेकडाउन” अंतर्गत गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून या कारवाईबद्दल वरिष्ठांनी संबंधित पोलिसांचे कौतुक केले आहे.
