अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार काम झाले तरच पुढे काम करू देऊ, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबू – पाटील


हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत ठेकेदाराचे काम थेट बंद पाडले. अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही कामात सुधारणा न झाल्याने हा संघर्ष उफाळून आला.


माहितीनुसार, सुमारे 295 कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप वारंवार होत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून काम थांबवण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंते घटनास्थळी भेट देऊन अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, प्रत्यक्षात ठेकेदाराने पुन्हा मनमानी पद्धतीने काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब लक्षात येताच वामनराव पाटील यांनी कामाच्या ठिकाणी धडक देत संबंधितांना जाब विचारला आणि अभियंत्यांशी संपर्क साधून तात्काळ काम बंद करण्यास भाग पाडले.


कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न स्थानिकांच्या मते, नव्याने करण्यात आलेले काँक्रीट काही तासांतच उखडू लागले, तर नालीची रचना देखील अयोग्य पद्धतीने केली जात आहे. जुन्या नालीला वगळून नवीन नाली रस्त्याच्या अगदी जवळ बांधली जात असल्याने रस्त्याची रुंदी कमी होत असून अपघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या निकृष्ट कामाबाबत परिसरातील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात येत आहे.

‘दर्जेदार कामच स्वीकारणार’ – पाटील
“अभियंत्यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार काम झाले तरच पुढे काम करू देऊ, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असा इशारा वामनराव पाटील वडगावकर यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे हिमायतनगरातील नाली बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




