मुंबई| “नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची अपार शक्ती असून, त्याच्या सामूहिक जपातून विश्वशांती प्रस्थापित होण्यास निश्चितच मदत होईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ कार्यक्रम वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास आचार्य परम सागर महाराज, निरंजन सागर महाराज, सौम्य सागर महाराज, मानव कोठारी, भगवत कोठारी, आशिष शहा यांची उपस्थिती होती.


मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संस्कृती ही विश्वबंधुत्व आणि शांतीचा संदेश देणारी आहे. “जिओ आणि जीने दो” हा जैन तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र असून, सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे, हा विचार जगासाठी मार्गदर्शक आहे. नवकार महामंत्र हा या मूल्यांना बळ देणारा असून त्याच्या जपातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

नवकार मंत्राद्वारे आपण पंचपरमेष्ठींचे स्मरण करून संपूर्ण सृष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या मंत्राच्या जपामुळे मनःशांती लाभते, ‘इनर सेल्फ’ शांत होते आणि सकारात्मक शक्तींशी आपले नाते दृढ होते, असेही त्यांनी सांगितले.जैन समाज भूतदया, प्राणीसेवा आणि अहिंसेचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा समाज असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला जैन समाजातील आचार्य, मुनी, उपाध्याय, साध्वी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.





