वादळी पावसाने हिमायतनगर तालुका हादरला; वीज खंडित, शेतीचे मोठे नुकसान
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहर व तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास निसर्गाने अचानक रौद्र रूप धारण करत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लावली. रात्री सुमारे अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या या वादळामुळे संपूर्ण शहरासह ग्रामीण भाग हादरून गेला.


तुफान वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी विजवाहिनीच्या तारा तुटून पडल्या, तर लहान-मोठी झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. परिणामी हिमायतनगर शहर व तालुक्यातील नागरिकांना रात्रभर अंधारात जागून काढावी लागली. अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाची सुरुवात झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या वादळाचा फटका शेती क्षेत्राला बसला आहे. अनेक ठिकाणी आंबा, चिकू यांसारख्या फळबागांचे मोठे नुकसान झाले असून वैरणीची पिकेही जमीनदोस्त झाली आहेत.

विशेष म्हणजे काढणीच्या टप्प्यावर असलेले गव्हाचे पीक या पावसामुळे धोक्यात आले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सर्वत्र आमली बारशीचा उत्सव साजरा होतांना अचानकसुरु झालेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाट व पावसाने एकीकडे उकाड्यापासून दिलासा, तर दुसरीकडे शेतीचे मोठे नुकसान—अशा दुहेरी परिस्थितीत हिमायतनगर शहर तालुका सध्या सापडला आहे.
