करियर

नवज्योत फाउंडेशनच्या तीन दिवसीय संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

नांदेड (गोविंद मुंडकर) नवज्योत फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय संस्कार शिबिराचा समारोप रविवारी दुपारी उत्साहात पार पडला. या शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला असून सभागृह तिन्ही दिवस विद्यार्थीांनी खचाखच भरलेले होते.

शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर समाजातील विविध अनिष्ट प्रवृत्ती आणि समस्यांवरही वक्त्यांनी अत्यंत प्रभावीपणे प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना सजग आणि जबाबदार नागरिक बनण्याचे मार्गदर्शन केले.

रविवारी झालेल्या समारोप सत्रात वेदांत देशमुख, सरदार उदयपाल, अश्विनी मंठाळकर ,सरदार हरजीत सिंघ आणि सरदार दीपसिंह फौजी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण विचार मांडले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि सामाजिक भान निर्माण झाले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सरदार चिरागीया यांनी केले.

याप्रसंगी नवज्योत फाऊंडेशनचे चेअरमन स.नौनिहालसिंघ जहागिरदार, नगरसेवक स.गुरमितसिंघ नवाब, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य चिरंजीलाल दागडीया, ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य शिवशंकर भानेगावकर, सायन्स कॉलेजच्या उपप्राचार्या अरुणा शुक्ला, पीपल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, मनपाचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त स.जगदीशसिंघ चिरागीया, उद्योजक अविनाश जाधव, स.हरजिंदरसिंघ चिरागिया यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!