दिव्यांगांच्या रखडलेल्या मानधनासाठी राहुल साळवे यांचा आंदोलनाचा इशारा
8 एप्रिलपासून ‘रिकाम्या खात्यांचा आक्रोश’

नांदेड| संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे रखडलेले मानधन तात्काळ जमा करावे, अन्यथा ८ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी दिला आहे.


याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात साळवे यांनी म्हटले आहे की, नांदेड शहर व जिल्ह्यातील काही निवडक लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून १५ ते २० दिवसांपूर्वी मानधन जमा करण्यात आले असले, तरी अनेक दिव्यांग बांधवांना अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


रखडलेले मानधन तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, तसेच या विलंबाची सखोल चौकशी करून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीने केली आहे.

या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ८ एप्रिल २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो दिव्यांगांच्या सहभागाने ‘रिकाम्या खात्यांचा आक्रोश’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही साळवे यांनी दिला आहे.




