हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| रामनवमी व आमली बारशीच्या पावन पर्वावर सरसम (बु.) ता. हिमायतनगर येथे बसवेश्वर देवस्थानाच्या वतीने आयोजित जंगी कुस्त्या स्पर्धा आणि भंडारा कार्यक्रम यंदाही उत्साहात पार पडला. परंपरा, क्रीडा आणि भक्तीचा संगम घडवणाऱ्या या सोहळ्याने परिसरात विशेष रंगत आणली.


दि. ३० मार्च २०२६ रोजी झालेल्या या कुस्ती फडात नामांकित पहलवानांनी दमदार झुंजी देत उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक झुंजीला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मैदानावर टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात वातावरण भारावून गेले होते.



स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी ₹९९९९, द्वितीय ₹७७७७, तृतीय ₹४४४४ आणि चतुर्थ क्रमांकासाठी ₹३३३३ अशी पारितोषिके देण्यात आली.


याचबरोबर भाविकांसाठी भव्य महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत भक्तिभाव व्यक्त केला.

ग्रामस्थ, युवक मंडळ आणि आयोजकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. या उपक्रमातून गावात एकोपा, परंपरा आणि क्रीडाप्रेमाची जपणूक होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.