पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

नांदेड/लातूर| अवैध गुटखा विक्रीवर मोठा आघात करत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत तब्बल 13 लाख रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या गुटखा विरोधी मोहिमेनंतरही काही विक्रेते गुपचूप व्यवसाय सुरू ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 1 एप्रिल रोजी वडवणा (ता. अहमदपूर) येथे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.


या वेळी एका मारुती इर्टिगा वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह सुमारे 6 लाख 24 हजारांचा गुटखा जप्त केला, तसेच एका खासगी कंपनीची सुमारे 13 लाख 24 हजार रुपये किमतीची कारही ताब्यात घेतली.
या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 123, 62, 223, 274, 275 (3)(5) आणि इतर संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अवैध गुटखा, पान मसाला व इतर प्रतिबंधित पदार्थांच्या विक्री, साठवण व वाहतुकी विरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी अवैध व्यवसायाची माहिती देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाईनचा वापर करावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.




