RPF-जीआरपीची संयुक्त कारवाई
स्नॅचिंग प्रकरणातील २ आरोपी ताब्यात , रेल्वे चोरी प्रकरणात एकास अटक

नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि जीआरपीच्या संयुक्त कारवाईत प्रवासी व रेल्वे सुरक्षेसंदर्भात मोठे यश मिळाले आहे. ‘ऑपरेशन रेल सुरक्षा’ आणि ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.


छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने रेल्वे यार्डमधून सुमारे ३० मीटर कॅटेनरी वायर (तांबे) आणि ७.५ मीटर डिस्चार्ज केबल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध RP(UP) कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.


दरम्यान, नांदेडमध्ये घडलेल्या उच्च मूल्याच्या स्नेचिंग प्रकरणात RPF आणि GRP च्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एका महिला प्रवाशाची सुमारे ७.२० लाख रुपये किमतीची सोन्या-चांदीचे दागिने व हिरे असलेली पर्स ट्रेनमध्ये हिसकावून नेण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील चौकशीसाठी जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे.


चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. या धडक कारवाईमुळे रेल्वे मालमत्ता व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF आणि GRP च्या सतर्कतेचे दर्शन घडले असून प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.




