रोजगार/सरकारी योजनास्थानिक

आईच्या कष्टांना यशाची किनार

रोहित बिच्चेवार यांची नांदेड पोलीस भरतीत दमदार कामगिरी

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | जिद्द, चिकाटी आणि आईच्या कष्टांचे मोल जाणणाऱ्या मुलाची कहाणी म्हणजे सरसम बु. येथील रोहित संदीप बिच्चेवार यांचे यश होय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोहित यांनी नांदेड जिल्हा पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवले असून त्यांच्या निवडीमुळे गावासह परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर घरावर दुःखाचे सावट आले होते. मात्र या कठीण काळात त्यांच्या आईने हार न मानता कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. “मुलांना शिकवून मोठे करायचे” या निर्धाराने त्यांनी रोहितला सतत प्रेरणा दिली. आईचे कष्ट आणि संघर्ष पाहून रोहित यांनीही स्वतःला अभ्यास व मैदानी चाचण्यांसाठी पूर्णतः झोकून दिले.

या अथक परिश्रमाचे फळ मिळत रोहित यांची नांदेड जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील आणि काका यांना दिले आहे.

रोहितच्या या यशामध्ये गावातील जि.प. केंद्र प्राथमिक शाळेचे अध्यक्ष गजानन बिच्चेवार यांचेही मार्गदर्शन लाभले. “रोहितच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून मन हळवे झाले,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

या यशाबद्दल लखन बिच्चेवार, गौरव बिच्चेवार परिवार, मित्रमंडळ व ग्रामस्थांनी रोहितचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित बिच्चेवार यांचे यश हे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!