महाराष्ट्र

हिमायतनगरात शिवाजी महाराज पुतळा जागेसाठी आंदोलन तीव्र; ‘गाव बंद’चा इशारा..!

उपोषणकर्त्यास विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा : चौथ्या दिवशी सायंकाळी व्रत्त लिहीपर्यंत उपोषण सुरूच होते

हिमायतनगर अनिल मादसवार | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी नगरपंचायत समोर सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी अधिकच तीव्र झाले असून, शहरातील वातावरण तापू लागले आहे. उपोषणकर्ते माधव शिंदे यांनी “जागा मिळेपर्यंत माघार नाही” असा निर्धार व्यक्त केला असून, आंदोलनस्थळी जमलेल्या समर्थकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, तातडीने जागा उपलब्ध करून दिली नाही तर सर्व समाजाला सोबत घेऊन गाव बंद आंदोलन छेडण्यात येईल.

दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वी सुचविलेल्या पाचही जागांपैकी एकही जागा देऊ शकत नसल्याचे पत्र दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे उपोषणकर्त्यांची एकप्रकारे अवहेलना झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी नगरपंचायत प्रशासनाच्या काही अधिकाऱ्याने भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

oplus_27262976

यावेळी उपोषणकर्त्याने जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असे ठणकावून सांगितले. तसेच ज्या ठिकाणी जागा आहे त्यातील पर्याय सुचवा त्यापैकी एक जागा निश्चित करू असे सांगितले. त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आंदोलनस्थळी नगरपंचायत चे ओएस चंद्रशेखर महाजन, अकाउंटंट श्री चिंतले, नगरसेवक राजेंद्र वानखेडे, सरदार खान, भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय देशपांडे, तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर, जेष्ठ शिवसैनिक बाळू अण्णा चवरे, गंगाधर मीराशे, मन्नान भाई यांच्यासह अनेक नागरिक व पत्रकार उपस्थित होते.

आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळत असून, नगरपंचायत प्रशासनावर तोडगा काढण्याचा दबाव वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळाली नाही तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शहरवासीयांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

हिमायतनगर शहरात नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणच्या सार्वजनिक मोक्याच्या ठिकाणच्या जागावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. काही जणांनी तर थेट त्यावर ताबा घेऊन बांधकाम करून व्यवसाय उभारले आहेत. असे गैरकारभार होतं असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मागितली तर जागा देऊ शकत नाही असे नगरपंचायत सांगत असल्याने उपोषण कर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आमच्या राजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळत नाही तर शहरात आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणावर कोणी कोणी ताबा मिळवून जागा हडप केली. या प्रकरणाकडे लक्ष घालण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल असा इशारा उपोषणकर्त्यांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरातील सार्वजनिक भूखंड कोणी हडप..? केला आहे का..?या चर्चेला उधाण आले आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!