नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवासी सेवांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असून, आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये रेल मदद (Rail Madad) या तक्रार निवारण मंचाद्वारे नोंदविल्या जाणाऱ्या प्रवासी तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे.


विभागातील विविध शाखांनी समन्वय साधत तक्रारींवर जलद प्रतिसाद देणे, त्यांचे प्रभावी निवारण करणे आणि सतत देखरेख ठेवणे या उपाययोजनांमुळे गाड्या व स्थानकांवरील प्रवासी अनुभवात सकारात्मक बदल दिसून आला आहे. परिणामी, प्रवाशांचा रेल्वे सेवांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.


विशेष म्हणजे, नांदेड विभागातील महत्त्वाची गाडी असलेल्या सचखंड एक्सप्रेसबाबतच्या प्रवासी तक्रारींमध्ये तब्बल ४६ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. याशिवाय, विभागाअंतर्गत धावणाऱ्या सर्व गाड्यांबाबत एकूण २६ टक्के तक्रारी कमी झाल्या आहेत, ही बाब विभागाच्या कार्यक्षमतेचे द्योतक मानली जात आहे.

रेल मदद प्रणालीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे नियमित विश्लेषण करून संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने उपाययोजना केल्या जात असल्याने ही सुधारणा शक्य झाली आहे. या प्रक्रियेमुळे केवळ तक्रारी कमी झाल्या नसून सेवा गुणवत्ता आणि प्रवासी समाधानातही वाढ झाली आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते नांदेड विभागाला “रेल मदद शिल्ड” प्रदान करून गौरविण्यात आले आहे. या यशामागे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समर्पित व समन्वयित प्रयत्न असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद करत त्यांचे विशेष कौतुक केले आहे. भविष्यातही प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी नांदेड विभाग कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




