माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांचा पक्षप्रवेश शिवसेनेला ‘बळ’
लोहा-कंधारमध्ये नव्या समीकरणांना वाव

लोहा|शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस ते शिवसेना असा विविध टप्प्यांतून गेलेला माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तब्बल बारा वर्षांनंतर त्यांच्या पुढाकाराने झालेल्या राजकीय मेळाव्यात धोंडगे बंधूंनी जमवलेली मोठी गर्दी त्यांच्या जनाधाराची साक्ष देणारी ठरली.


सत्तेत किंवा कोणत्याही पदावर नसतानाही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे गावपातळीवर धोंडगे यांना मानणारा ठोस वर्ग असल्याचे स्पष्ट झाले. आगामी २०२९ मधील परिसीमन, महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे लोहा-कंधार मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर शिवराज धोंडगे यांच्या राजकीय पदार्पणानेही चर्चेला उधाण आले आहे.


शंकरअण्णा धोंडगे हे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारधारेतून घडलेले नेतृत्व मानले जाते. “भीक नको, घामाचे दाम हवे” हा त्यांचा नारा राज्यभर गाजला होता. १९९५ पासून त्यांनी कंधार-लोहा विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली नव्हती.

दरम्यान, बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी बीआरएसच्या माध्यमातूनही सक्रियता दाखवली होती. मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली आहे. शिंदे यांनीही धोंडगे यांच्या कार्याची प्रशंसा केल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत त्यांना महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


लोहा-कंधार मतदारसंघात पूर्वीप्रमाणेच कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभे करणाऱ्या नेत्यांमध्ये धोंडगे यांचे नाव घेतले जाते. सध्याच्या घडीला प्रतापराव पाटील चिखलीकर आणि शंकरअण्णा धोंडगे हे दोन प्रमुख प्रभावी नेते मानले जात आहेत. भविष्यात ‘धोंडगे विरुद्ध धोंडगे’ अशी लढत रंगणार का, याबाबत उत्सुकता असली तरी त्यावर भाष्य करणे सध्या लवकर ठरेल. एकंदरीत, शंकरअण्णा धोंडगे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला ग्रामीण भागात एक सक्षम व अनुभवी नेतृत्व मिळाले असून, नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधत पक्षाची ताकद वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जुने भिडू – नवा डाव – लोहा-कंधारच्या राजकारणात अनेक वर्षे सक्रिय असलेले शंकरअण्णा धोंडगे यांनी पुन्हा एकदा नव्या राजकीय डावाची सुरुवात केली आहे. त्यांच्या सोबत जुने कार्यकर्ते पुन्हा एकत्र येत असल्याचे चित्र दिसत असून, नव्या पिढीतील शिवराज धोंडगे यांच्या एंट्रीमुळे या लढतीला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात या ‘जुन्या भिडूं’चा ‘नवा डाव’ राजकारणात काय परिणाम घडवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



