नांदेडमध्ये पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; 5 दिवसांत 97 हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई

ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी मोहीम; 73 गुन्हे दाखल

नांदेड| शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशनला मोठे यश मिळाले आहे. मागील पाच दिवसांत 97 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून 73 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 11 एप्रिल रोजी पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

या ऑपरेशनदरम्यान चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे, अवैध शस्त्र बाळगणारे, तडीपार/हद्दपार आरोपी, हिस्ट्रीशीटर आणि सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. 97 पेक्षा अधिक आरोपींवर कारवाई, 85 आरोपींवर थेट कारवाई, एकूण 73 गुन्हे दाखल, मपोका कलम 55 अंतर्गत 13, तर 56/57 अंतर्गत 30 जणांची तपासणी, तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 6 जणांवर गुन्हे, मपोका कलम 122 अंतर्गत 2 जणांवर, तर कलम 109 अंतर्गत 1 जणावर कारवाई.

याशिवाय नाकाबंदी दरम्यान एका व्यक्तीकडून अवैध गुटखा जप्त करण्यात आला असून सुमारे 53,980 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. पुढील काळातही अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top