नांदेड (प्रतिनिधी) शहरात वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढत सोमवारी पहाटे आणखी एक खळबळजनक हत्याकांड घडले. श्रीनगर परिसरात युवा नेते सोनू कल्याणकर यांची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नांदेडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सलग हत्यांच्या मालिकेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास सोनू कल्याणकर हे नेहमीप्रमाणे आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर पडले होते. त्याच वेळी पंचशील कापड दुकानाजवळ अचानक एक चारचाकी वाहन थांबले. वाहनातून उतरलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, चाकू आणि तलवारींसारख्या धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.


अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झालेल्या या हल्ल्यात हल्लेखोरांनी शरीरावर सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणी एक संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, सोनू कल्याणकर हे पूर्वी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी होते आणि सध्या शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेत शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते शिवा नरंगले यांचे नातेवाईक असल्याने या घटनेला राजकीय आणि सामाजिक रंगही प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, शहरात गेल्या तीन दिवसांत पाच हत्यांच्या घटना घडल्या असून या सर्व घटना गँगवॉरशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे नांदेडमध्ये गुन्हेगारी टोळ्यांची पुन्हा वाढती सक्रियता स्पष्ट होत आहे.

एकेकाळी शांत असलेले शहर आता पुन्हा गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भररस्त्यात आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या या हत्या थांबवण्यासाठी पोलिसांनी ठोस आणि कडक कारवाई करणे अत्यावश्यक बनले आहे, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




