देगलूर पोलिसांची सट्टा जुगारावर धडक; ४ आरोपींवर कारवाई, लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

नांदेड/देगलूर (प्रतिनिधी) अवैधरित्या ऑनलाईन सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर देगलूर पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण १ लाख ५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, देगलूर शहराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत काही जण ऑनलाईन क्रिकेट सट्टा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानुसार पोलीस निरीक्षक मारोती श्रीराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ५ एप्रिल रोजी सायंकाळी छापा टाकला. छाप्यात आरोपी मोबाईलद्वारे ऑनलाईन आयडीवर पैसे लावून सट्टा खेळत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाईल (किंमत सुमारे ३१ हजार रुपये), एक स्कूटी (१० हजार रुपये) तसेच ४,४८० रुपये रोख रक्कम असा एकूण १,०५,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींमध्ये एकूण चार जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक केले असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top