हिमायतनगर/वडगाव| तालुक्यातील टाकराळा बु. बस स्टॉपजवळ सायंकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान भीषण अपघात घडला. विवाह सोहळा आटोपून दरेगावकडे परतणाऱ्या जिप्सी टेम्पोला वीट वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दरेगाव येथील एकाच कुटुंबातील सदस्य आंध्र प्रदेशातील निर्मल येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर टाकराळा बु. येथे त्यांच्या जिप्सी टेम्पोला मागून येणाऱ्या वीट भरलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. धडकेनंतर जिप्सी पलटी झाली, मात्र धडक देणाऱ्या टेम्पोने वेळीच ब्रेक न लावता सुमारे 40 ते 50 फूट वाहन फरफटत नेल्याने अपघाताचे गांभीर्य वाढले.
या अपघातात महिलांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून एकूण 15 प्रवाशांपैकी 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक युवकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना भोकर येथील स्पंदन रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर चार गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अपघातानंतर वीट वाहतूक टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर येत आहे.
नागरिकांमध्ये संताप महामार्गावर कालबाह्य व बेफिकीरपणे धावणाऱ्या वीट वाहतूक वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणांनी अशा वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. गाडीत असलेल्या 15 प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गंभीर मार लागला यामध्ये श्रद्धा विनोद बोईनवाड वय 9 वर्ष राहणार दरेगाव तालुका हिमायतनगर, सुमन विनोद बोईनवाड वय 35 वर्ष निर्मलाबाई नागोराव बोईनवाड वय 65 वर्ष गजानन तानाजी पुरणवाड वय 22 वर्ष आनंद किशन चेनेबोणेवार वय 38 वर्ष किरण आनंद चेनेबोनेवार वय 35 वर्ष, वैष्णवी विनोद बोईनवाड वय 6 वर्ष, विनोद नागोराव बोईनवाड वय 35 वर्ष मनोज नागोराव बोईनवाड वय 30 वर्ष गायत्री मनोज बोईनवाड व 12 वर्षे वरील सर्व दरेगाव येथील रहिवासी असून मोठ्या प्रमाणात छोट्या मुलीं, महिला व नागरिक जबर जखमी झाले आहेत.
“कालबाह्य वीट वाहतूक वाहनांवर तातडीने कारवाई करा” — वामनराव पाटील वडगावकर
नांदेड–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर दररोज वीट वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. अनेक वाहने कालबाह्य अवस्थेत असूनही रस्त्यावर धावत असल्याने वारंवार अपघात घडत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मार्गावर वीट वाहतूक करणारी वाहने वेगमर्यादा न पाळता बेदरकारपणे चालवली जात आहेत. त्यामुळे वाहन पलटी होणे, समोरील किंवा पाठीमागील वाहनांना धडक देणे अशा अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत.
“नांदेड–हिमायतनगर महामार्गावर कालबाह्य व धोकादायक स्थितीत असलेली वीट वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात धावत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आरटीओ विभागाने तातडीने या वाहनांची तपासणी करून नियमबाह्य व कालबाह्य वाहने वाहतुकीतून बंद करावीत, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील.”