जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांविरोधातील उपोषणाचा दुसरा दिवस; प्रशासनाची उदासीनता चर्चेत

नांदेड| जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी व मुलांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने दुसऱ्या दिवसाअखेरही दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पत्नी दैवशाला जगदीश बारदेवाड यांनी आपल्या चिमुकल्यांसह 6 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पतीकडून मानसिक छळ, पालनपोषणाचा अभाव आणि गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहण्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: मुलांच्या पालनपोषण व शिक्षणाचा खर्च करावा, जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावीत, सेवापुस्तिकेत पत्नी व मुलांची नोंद करावी, कुटुंबासोबत राहून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, घराचे थकीत हप्ते भरावेत आदी मागण्याचा समवेश आहे.

दरम्यान, उपोषणाचा दुसरा दिवस उलटूनही प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे “प्रशासन संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहे का?” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

उपोषणामुळे सौ. दैवशाला बारदेवाड यांची प्रकृती खालावत असून, त्यांच्या सोबत असलेली लहान मुलेही त्रस्त झाल्याचे चित्र आहे. शाळेचा अभ्यास बुडू नये म्हणून मुले उपोषणस्थळीच अभ्यास करत असल्याचे भावनिक दृश्य समोर आले आहे. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top