नांदेड| उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दक्षिण रेल्वेने, दक्षिण मध्य रेल्वेच्या समन्वयाने, कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेमुळे दक्षिण व उत्तर भारतातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


गाडी क्रमांक 06181 कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 9 एप्रिल ते 4 जून 2026 या कालावधीत दर गुरुवारी पहाटे 2.30 वाजता कोयंबतूर येथून सुटून शनिवारी दुपारी 1.25 वाजता जयपूर येथे पोहोचेल. या दरम्यान एकूण 9 फेऱ्या होणार आहेत.


परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 06182 जयपूर–कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 12 एप्रिल ते 7 जून 2026 या कालावधीत दर रविवारी रात्री 10.05 वाजता जयपूरहून सुटून बुधवारी सकाळी 8.30 वाजता कोयंबतूर येथे पोहोचेल. या गाडीच्याही 9 फेऱ्या नियोजित आहेत. या विशेष गाडीत 20 एलएचबी डबे असतील. त्यामध्ये 18 वातानुकूलित थ्री-टियर डबे आणि 2 लगेज-कम-ब्रेक व्हॅनचा समावेश असून ही गाडी विद्युत इंजिनाद्वारे चालवली जाणार आहे.

ही गाडी तिरुप्पूर, इरोड, सालेम, कटपडी, रेणीगुंटा, काचीगुडा, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, गोधरा, रतलाम, नीमच, चित्तौडगड आणि अजमेर मार्गे धावणार आहे. नांदेड विभागातील मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम आणि अकोला या स्थानकांवर या गाडीचे थांबे असणार असून, या भागातील प्रवाशांना राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यांशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घेऊन आपला प्रवास नियोजनबद्ध करण्याचे आवाहन केले आहे.





