
नांदेड, अनिल मादसवार | जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून सर्व गॅस वितरकांना ‘घरपोच सेवा अनिवार्य’ करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस सर्व गॅस कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स आणि एजन्सी धारक उपस्थित होते. वाढती गर्दी, तक्रारी आणि ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने ही ठोस पावले उचलली आहेत.
एजन्सीवरून थेट वितरणास बंदी
ग्राहकांना एजन्सीवर बोलावून सिलिंडर देण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच गॅस सिलिंडर पोहोचवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
गर्दी टाळण्यासाठी नियोजन
एजन्सीवर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी बुकिंगनंतर वेळेत घरपोच वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्राहकांनीही संयम राखत एजन्सीवर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले.
e-KYC आता घरबसल्या शक्य
ग्राहकांची सोय लक्षात घेऊन e-KYC प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. ‘Aadhaar Face RD’ अॅप तसेच संबंधित गॅस कंपन्यांचे अधिकृत अॅप वापरून ग्राहक घरबसल्या e-KYC पूर्ण करू शकतात. यामुळे एजन्सींवरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करतांना काही अडचण आल्यास आपण खालील कंपनीच्या सेल्स ऑफिसर यांचे संपर्क साधावा. मनोजकुमार राणा, सेल्स ऑफिसर BPCL, मो.क्रं. 9130084746, जय सिंघ, सेल्स ऑफिसर IOCL, मो.क्रं. 9561366893, सचिनकुमार, सेल्स ऑफिसर HPCL, मो.क्रं. 9594820665
तक्रारींसाठी विशेष संपर्क व्यवस्था
गॅस पुरवठ्यात अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील पुरवठा अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच BPCL, IOCL आणि HPCL कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले असून, ते पुढीलप्रमाणे आहेत. संपर्क मो.क्रं.:- नांदेड- ७०३०७७३०४०, अर्धापूर-८८०५०६८९५४, मुखेड- ९३५६८०६४०५, धर्माबाद-९४२१८४१४४७,मुदखेड- ९४४५११२७८२,उमरी- ८८०५४४७८३७,बिलोली- ७६२०७७९७०६, लोहा- ९६५७२२४०४२,हिमायतनगर- ८३०८०७३०८९, हदगांव-८८०५०६८९५४, कंधार-९८२३७५७३४५, माहूर-९४०३१८४४७३, किनवट-९८५०२९६०९६, भोकर- ९४२११८३६०२, देगलूर-९४२३८०५०६४,नायगांव- ७०५७००२८६५ थेटलिंक: ग्राहक https://www.pmuy.gov.in/e-kyc.html या लिंकवर जाऊनही माहिती घेऊ शकतात.
अफवांवर विश्वास ठेवू नका
जिल्ह्यात गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार असून गॅस वितरण व्यवस्थेत अधिक शिस्त आणि पारदर्शकता येणार असल्याचे चित्र आहे.
