करियर

बोगस भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधातील उपोषण स्थगित; प्रशासनाचे लेखी आश्वासन

81 वर्षाच्या अध्यक्षांच्या उपोषणापुढे प्रशासन झुकले, तीनही संस्थेवर प्रशासकाची नेमणुक करण्याचे आश्वासन

नांदेड| बोगस नोकरभरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याविरोधात सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले. 81 वर्षीय संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव गणपतराव कदम यांच्या उपोषणासमोर प्रशासन झुकल्याचे चित्र पाहायला मिळाले.

श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, कंधारचे अध्यक्ष व्यंकटराव कदम यांनी 23 मार्चपासून 17 मागण्यांसह दोन प्रमुख मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. यामध्ये बोगस नोकरभरती, बदली व पदोन्नती रद्द करणे, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच बोगस शालार्थ आयडी रद्द करून शासनाचे नुकसान वसूल करण्याची मागणी होती.

प्रशासनाचे लेखी आश्वासन – 27 मार्च रोजी सायंकाळी शिक्षणाधिकारी (नियोजन) दिलीप रावजी बनसोडे यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांशी चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित संस्थेतील अनियमिततेबाबत अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सादर केल्याचे लेखी पत्र देण्यात आले.

या पत्रात संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या: कर्मचारी भरतीतील अनियमितता, बदली व पदोन्नतीतील गोंधळ, कर्मचाऱ्यांचे वेतन न देणे या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रशासनाने संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या खालील शाळांवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले:

  • दीनदयाळ उच्च माध्यमिक विद्यालय, कासारखेडा
  • दीनदयाळ विद्यालय, बेट सांगवी (ता. लोहा)
  • शांतीदूत गोविंदराव पाटील विद्यालय, गोणार (ता. कंधार)

लेखी आश्वासन मिळाल्यानंतर व्यंकटराव कदम यांनी रात्री 8 वाजता फळांचा रस घेऊन उपोषण मागे घेतले. या उपोषणाला स्थानिक पदाधिकारी, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला बळ मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!