जातविरहित पद्धतीने डॉ. आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होणार
डिजेमुक्त, बॅनरमुक्त उपक्रमाची घोषणा

नांदेड | राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा नांदेडमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने, जातविरहित आणि पारंपारिक स्वरूपात जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव पूर्णपणे डिजेमुक्त, बॅनरमुक्त आणि वर्गणीमुक्त असणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.


या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव यांची, तर सचिवपदी उद्योजक बालाजी इबितदार यांची निवड करण्यात आली आहे.


फुले-शाहू-आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण खंदारे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, १४ एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत भव्य जयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा प्रारंभ राज कॉर्नर येथून होणार असून, विविध समाजघटकांतील मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत.

या मिरवणुकीत मशाल रॅली, हलगी पथक, मुलींचे लेझीम पथक, ढोलपथक, आदिवासी ढेमसा नृत्य, जीवंत देखावे, बैलगाड्या तसेच डॉ. आंबेडकरांची भव्य प्रतिमा असलेला रथ अशा विविध आकर्षणांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, कोणताही डिजे न वापरता पारंपारिक व सांस्कृतिक पद्धतीने जयंती साजरी करण्यावर भर देण्यात आला आहे.

समितीमध्ये उपाध्यक्षपदी सुयश शिंदे, सहसचिव गजानन मेडके, कोषाध्यक्ष महेंद्र देमगुंडे, तर सदस्य म्हणून कमलाकर बिरादार आणि प्रविणकुमार देशमुख यांचीही निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक, वकील आदी मान्यवरांचा या महोत्सवात सहभाग राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संयोजक शुद्धोधन एडके यांनी नांदेडकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
“रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्यकाळात कधीही जात-पात पाहिली नाही. त्याच धर्तीवर महापुरुषांची जयंती जातविरहित साजरी व्हावी,” असे आवाहन अध्यक्ष गिरीश जाधव यांनी केले. “डॉ. आंबेडकर हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यांना एका जातीत मर्यादित करता येणार नाही. त्यामुळे ही जयंती डिजेमुक्त, बॅनरमुक्त आणि पावतीमुक्त ठेवली आहे,” अशी भूमिका सचिव बालाजी इबितदार यांनी मांडली.



